मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या भागात कोरोना 'कोविड 19' च्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे, अशा भागांमध्ये अर्थात 'कंटेनमेंट झोन' परिसरात किंवा त्यालगतच्या परिसरात महापालिकेद्वारे 'फिव्हर क्लिनीक'चे आयोजन करण्यात येत आहे.
या 'क्लिनिक'मध्ये बाधित रुग्णांच्या इमारतीत किंवा लगतच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यानुसार महापालिकेने आजवर ९७ 'फिव्हर क्लिनीक' चे आयोजन केले आहे.
या 'क्लिनिक'मध्ये आजवर 3 हजार 585 व्यक्तींची करोना विषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली. ज्यापैकी निर्धारित निकषांनुसार ९१२ व्यक्तींचे नमुने आवश्यक त्या तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर 5 व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे.
हे पाच व्यक्तीदेखील 'ट्रॅव्हल हिस्टरी' असणारे वा ट्रॅव्हल हिस्टरी असणाऱ्यांच्या निकटच्या संपर्कात असणारे होते.'फिव्हर क्लिनिक' हे अधिक तीव्रता असलेल्या दाटीवाटीच्या किंवा झोपडपट्टीच्या भागांमध्ये आयोजित करण्यात येतात, ही बाब लक्षात घेतल्यास आणि तपासणी करण्यात आलेल्या 912 नमुन्यांपैकी 5 व्यक्तींचे नमुने बाधित आढळून आले. याचाच अर्थ 0.54 टक्के अर्थात सुमारे अर्धा टक्के लोक बाधित आढळून आले.